www.arundevelopers.com

2013/12/03

पुण्यात घरांचे अनेक पर्याय-प्रॉपर्टी-लाइफस्टाइल-Maharashtra Times


http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/property/home-at-pune/articleshow/26597868.cms

पुण्यात घरांचे अनेक पर्याय-प्रॉपर्टी-लाइफस्टाइल-Maharashtra Times

गेल्या काही वर्षांत पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, वाघोली, तळेगाव, कामशेत, खेड-शिवापूर, किरकटवाडी, उरळीकांचन, पिरंगुट आदी ठिकाणी नवे प्रोजेक्ट सुरू आहेत. या ठिकाणी घरांचे भाव तुलनेने कमी आहेत. त्यामुळे बजेट हाउसिंगसाठी या ठिकाणचा विचार करता येऊ शकतो.

दसरा-दिवाळी होऊन गेली असली, तरी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज होत आहे. पुढील वर्षी नवे काय करायचे, अशा चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. काही जणे नवा संकल्प करतात, तर काही जण खेदीच्या माध्यमातून आनंद लुटतात. ही खरेदी मग, एखादे गॅजेट्, कारची असू शकते किंवा घराची. गेल्या दोन वर्षांत स्थावर मालमत्ता क्षेत्रात परिस्थिती बदलली आहे. पूर्वी स्थावर मालमत्ता ही केवळ निवाऱ्याची गरज भागविणारी गोष्ट म्हणून त्याकडे पाहिले जात होते. अजूनही अनेकजण पहिले घर घेण्यासाठी आपल्या आयुष्याची कमाई घालवितात.

पूर्वी घरासाठी कर्ज घेणे ही अवघड बाब होती. आता नसली, तरी अनेक कागदपत्रे, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क यामुळे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा जीव मेटाकुटीला येतो. मात्र, कर्ज मिळल्यामुळे स्वप्नातील महल प्रत्यक्षात साकार होणार असल्याने तो हे सर्व सहन करतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डरांनी अनेक गृहप्रकल्प योजना सादर केल्या आहेत. रास्त दरातील घरे, मिड हाउसिंग, अल्ट्रा प्रीमियम, प्रीमियम, लक्झरी प्रोजेक्ट, एनए प्लॉट, फार्म हाउस प्लॉट आदी योजनांचा समावेश आहे.

नवे उद्योग येत असल्याने पुण्याच्या कक्षा रूंदावत आहेत; तसेच मुंबई-बेगळुरू औद्योगिक क्षेत्रामुळे सातारा, शिरवळ, खेड-शिवापूर, नसरापूर आदी ठिकाणी विकास होण्यास सुरुवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील काही भाग पालिका हद्दीतील नाही; तसेच आंबेगावचा काहीच भाव पालिकेत आहे. त्यामुळे पालिका हद्दीत घरांचे भाव काहीसे चढे आहेत. आज ना उद्या हे भाग पालिका हद्दीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील विचार करता या ठिकाणी सुरू असलेल्या आणि लाँच होत असलेल्या रेसिडेंशिअल प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करण्याच्या संधीचा विचार करायला हरकत नाही. विस्तार असलेल्या पुण्याचा विचार केल्यास दक्षिण बाजूस आंबेगाव, नऱ्हे, धायरी, किरकटवाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. ही ठिकाणे रस्त्यांनी सर्व ठिकाणी जोडलेली आहे. शाळा, कॉलेज, मॉल, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटल आदी सुविधा या भागात गेल्या दहा वर्षांत उभ्या राहिल्या आहे. घर खरेदीसाठी एखाद्या भागाची निवड करताना तेथील दर, सुविधा याच गोष्टी प्रामुख्याने विचारात घेण्यासारख्या असतात. या ठिकाणचे दरही अन्य भागाच्या तुलेनत रास्त आहेत. ३५ -३८ लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी एक बीएचके, ४५-७० लाख रुपयांदरम्यान (काही अपवाद) टू बीएचके उपलब्ध आहे. रो-हाउस, बंगला घेण्याचे स्वप्न या भागाचा विचार केल्यास पूर्ण होऊ शकते. अनेक बिल्डरकडून या ठिकाणी रो-हाउस, बंगल्याच्या स्कीमही बांधल्या जात आहेत. साधे घर ते आधुनिक अॅमेनिटीज असणारा प्रोजेक्ट, एक बिल्डिंगची सोसायटी ते मोठा प्रोजेक्ट, तर टाउनशिप या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार घराचा प्रकार आणि कोणत्या प्रोजेक्ट प्रकारात घर घ्यायचे याचा निर्णय घेऊ शकते.

कोथरूडचे अॅनेक्स म्हणून उदयास येत असलेल्या उत्तमनगरचे कोथरूड असेच मार्केटिंग सुरू आहे. कोथरूड बजेट बाहेर असणाऱ्यांना या अॅनेक्स कोथरूडचा विचार करून कोथरूड भागात घर घेण्याचे स्वप्न साकार करता येऊ शकते.

हिंजवडीच्या दिशने विचार केल्यास बाणेर, बालेवाडी, औंध, बावधन, सूस या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत. आयटी हब या ठिकाणजवळ असल्याने या ठिकाणी घर घेण्यास प्रीमिअम मोजण्याची तयारी असणाऱ्यांनी या भागाचा विचार करावा. कोंढवा, उंड्री हा पुण्याच्या पूर्वेकडील भागही गेल्या दहा वर्षांपासून वाढण्यास सुरूवात झाली आहे. सिंहगड रोडच्या तुलनेक विकास कमी असला, तरी लो-बजेट असणाऱ्यांसाठी हा भाग एक चांगला पर्याय ठरू शकतो. या भागात काही ठिकाणी हायएंड, तर काही ठिकाणी मिड हाउसिंग प्रकारातील प्रोजेक्ट सुरू आहेत.

सिंहगड रोडपेक्षा दर थोडे कमी आहेत. त्यामुळे थोडीशी अडचण सहन करण्याची तयारी असल्यास मोठ्या घराचे म्हणजे टू बीएचकेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

नगर रस्त्यावर वाघोलीपर्यंत बांधकाम सुरू आहेत. काही भागात हायएंड प्रोजेक्ट सुरू आहेत; तसेच मिड हाउसिंग आणि रास्त दरातील घरांचे प्रोजेक्टही या भागात सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येकाला बजेटनुसार उपलब्ध आहेत.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा विचार करीत असलेल्यांसाठी पिरंगुट, तळेगाव दाभाडे, कामशेत, चाकण, भोसरी, रहाटणी आदी भागांचा विचार करायला हरकत नाही. विशेषतः तळेगाव आणि कामशेत ही ठिकाणे रस्ते आणि लोहमार्ग यांनी जोडलेली आहेत. या ठिकाणी राहणारी अनेक मंडळी कामानिमित्त लोकलद्वारे पुण्यात ये-जा करतात. या ठिकामी दरही सध्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे आयुष्यातील स्वतःचे पहिले घर घेण्याचे स्वप्न कमी बजेट असणाऱ्यांचे पूर्ण होऊ शकते. तळेगावमध्ये मोठ्या प्रमाण इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट सुरू आहे. त्यामुळे या ठिकणचा विकास होत आहे. भविष्याचा विचार करता सध्या घेऊन ठेवलेल्या घरावर चांगले रिटर्न मिळू शकतात. त्यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे हे एक डेस्टिनेश म्हणायला हरकत नाही. चाकण या ठिकाणीही इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणीही घर घेऊन रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे स्वप्न साकार होऊ शकते. प्रत्येकाल आपल्या बजेटनुसार राहण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी घराचे पर्याय उपलब्ध आहेत.